अल्पावधीतच ‘या’ लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप; कमी टीआरपीमुळे गाशा गुंडाळला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका अचानक ऑफ एअर गेल्या. यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचा समावेश होता. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘लोकमान्य’ , ’36 गुणी जोडी’ , ‘तू चाल पुढं’ या आणि अन्य काही मालिका नुकत्याच ऑफ एअर गेल्या. यानंतर आता आणखी एका लोकप्रिय मालिका अल्पावधीतच अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. सध्या मालिकेला टीआरपी नसेल तर ती मालिका बंद करण्याचा जणू काही ट्रेंड आलाय. याच ट्रेंडला ‘ खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ‘ ही मालिका देखील बळी पडली आहे.

मालिका सुरू राहण्यासाठी टीआरपी हा महत्वाचा घटक झाल्यामुळे अनेक मालिका बंद करण्यात आल्या. काही महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’वरील ‘कस्तुरी’ या मालिकेने फक्त तीन महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. यानंतर आता घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये सुरू झालेल्या ‘ खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ‘ या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. ‘जगात वाईट पुरुष जात, सगळेच लुच्चे एकसाथ..’ म्हणत आलेल्या तेंडुलकर कुटुंबातील महिलांच्या या गोष्टीची नुकतीच सांगता पार पडली. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेचा १२ जानेवारी २०२४ रोजी शेवटचा भाग प्रसारित झाला आणि ही मालिका संपली.

‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेत नयना आपटे, सीमा देशमुख, शर्वाणी पिल्ले, विनय येडेकर यांसारखे दमदार कलाकार झळकले. त्यांच्यासोबत महिमा म्हात्रे, रेवती लिमये, अनुज साळुंखे, अमित खेडेकर, अजिंक्य जोशी हे नवोदित कलाकार देखील या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले. दरम्यान, ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ या मालिकेच्या अचानक ऑफ एअर जाण्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या मालिकेतील अभिनेता अनुज साळुंखे आता झी मराठीवरील नवी मालिका ‘ पारु ‘ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.