हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कुशल एक उत्तम अभिनेता आहे आणि त्यासोबत तो एक उत्तम लेखकसुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट या फार लक्षवेधी ठरल्या. त्याच्या लेखणीतून तो कायम व्यक्त होत आला आहे आणि म्हणूनच त्याच्या पोस्ट चाहत्यांच्या मनाला भावतात. आता कुशलने बायकोच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. जी फारच भावनिक आहे.
कुशल बद्रिकेने बायकोसोबतचे काही खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘संसार म्हंटल की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब. आता हिशोब लावला, ”तुझ्या- माझ्या” नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी! आपल्या पहिल्या घराचं booking करण्यासाठी तुझी एकमेक असलेली policy मोडली होती आपण, आता पुन्हा नवीन घर घेता येईल, पण ती “ती वेळ” परत करण्याची policy अजून कोणत्याच company कडे नाही बघ. एका दसऱ्याला “झेंडूची फूलं” परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू..? सांग!’
‘अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं, संक्रांतीला काळी साडी नेसायची अश्या सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या “व्यथा” जपण्यात गेला यार… आता परवा परवाचीच गोष्ट नाही का..? mental stress’च्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठीवरून हाथ फिरवत बसली होतीस…. ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी..? माझ्यासाठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवां पलिकडे काहीही देता येणार नाही मला. sorry आणि happy birthday (सुकून)’.