देशमुखांच्या घरी ‘अशी’ साजरी होते मकर संक्रांत; जिनिलियाने Insta’वर शेअर केली खास झलक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे पावर कपल सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतं. रितेश – जिनिलियाच्या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहीलं जातं. जिनिलिया मूळ अमराठी असली तरी देशमुखांच्या घरी लग्न करून आल्यानंतर तिने मराठी परंपरा, पूजा, सण आत्मसाद करून घेतले. ज्यामुळे जिनिलियाचे कायम कौतुक केले जाते. अशातच नुकतीच मकर संक्रांत पार पडली आणि हा सण देशमुखांच्या घरी कसा साजरा केला जातो याची एक झलक अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अधिकृत सोशल मिडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री जिनिलिया देशमुखने तिच्या सासरी मकर संक्रातीचा सण कसा साजरा केला याचा व्हिडिओ शेअर केला आहे. मराठमोळ्या रीती- परंपरेनुसार जिनिलियाने देशमुखांच्या घरी मकर संक्रांतीचे पूजन केले आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केल्याचे आपण या व्हिडिओत पाहू शकतो. हा खास व्हिडिओ शेअर करताना जिनिलियाने आपल्या लाडक्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी दिवाळी, वटपौर्णिमा आणि असे बरेच मराठी सण जिनिलियाने आपल्या कुटुंबासोबत साजरे करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, रितेश देशमुख आणि जिनिलीयाच्या लग्नाला १० वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. त्यामुळे जिनिलिया आता केवळ देशमुखांची नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची लाडकी सूनबाई झाली आहे. जिनिलिया एक उत्तम अभिनेत्री आहेच, पण त्यासोबत आता ती एक उत्तम बायको, सुन आणि आईदेखील आहे. मध्यंतरी तिने सिनेविश्वापासून बरेच अंतर राखले होते. मात्र आता तिने कमबॅक केले आहे. इतकेच नव्हे, तर रितेशच्या पहिल्या दिग्दर्शित मराठी सिनेमात ती मुख्य भूमिकेत झळकली. रितेश आणि जिनिलियाने ‘वेड’ या चित्रपटातून अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं. यानंतर आता रितेश लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, जिनिलीया शेवटची ‘ट्रायल पीरियड’ या चित्रपटात झळकली होती.