हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 17’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून दररोजचा मसाला प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. यामध्ये नुकताच फॅमिली वीक पार पडला. ज्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या आई बिग बॉस हाऊसमध्ये आल्या होत्या. दरम्यान विकीच्या आईने शोमध्ये येऊन अंकिताने विकीला लाथ मारली तेव्हा विकीच्या वडिलांनी थेट अंकिताच्या आईला फोन केल्याचा खुलासा केला. ज्यामुळे अंकिता दुखावली गेली. दरम्यान, रश्मी देसाई, ऐश्वर्या शर्मा ते राखी सावंत अशा अनेक कलाकारांनी अंकिताच्या बाजूने तिच्या सासूबाईंचा क्लास घेतला.
राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले, ‘मी अंकिताच्या सासूला हे सांगू इच्छिते की ”सास भी कभी बहू थी” तुम्ही नवरा- बायकोच्या भांडणात का पडताय..? एकदा तुमच्या मुलाने विक्कीने अंकिताशी लग्न केलं ना, मग तुम्ही त्यात का हस्तक्षेप करताय..? सासूबाई शांततेत बसा ना. खा- प्या आणि ऐश करा सासूबाई. अंकिताच ट्रॉफी जिंकणार आहे. अंकिता बिग बॉस जिंकणार आहे, ही माझी भविष्यवाणी आहे. आमची मराठी मुलगी अंकिताच शो जिंकणार आहे. मग तुम्ही आनंद व्यक्त कराल की माझी सून जिंकली, माझी सून जिंकली. असं करू नका अंकिताच्या सासूबाई. शांत बसा’.
‘तुमचा मुलगा आणि सून यांच्यात बोलू नका. सुनेचा आदर करा. मग तुमच्या मुलीचाही आदर केला जाईल. अंकिता माझी बहीण आहे. मी तुम्हाला तुमच्या घरी भेटले होते, तुम्हाला आठवतंय का? मी आले होते. तुम्ही मला देवीसारख्या वाटल्या होत्या. पण अचानक तुम्ही अशा कशा झाल्यात? कैकेयी होऊ नका. संसार उद्ध्वस्त करू नका. विकी चांगला मुलगा आहे. चांगला नवरा आहे. त्याला प्रेमाने सांगा की त्याच्या पत्नीला साथ दे. हे बिग बॉसचे घर आहे. इथे वाद आणि भांडणं होतच असतात. यात काय मोठी गोष्ट आहे? अंकिता तुमची सून नाही मुलगी आहे, तिला प्रेमाने ठेवा’.