हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी एकमेकांचे कट्टर, खास दोस्त आहेत. यातील कित्येकांच्या मैत्रीची कायम उदाहरणे दिली जातात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकरसुद्धा अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. त्यांनी क्लासमेट, ‘वजनदार’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर आता ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या माध्यमातून त्यांनी केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू असून दोघेही यात व्यस्त आहेत.
‘श्रीदेवी प्रसन्न’च्या प्रमोशन दरम्यान एका वाहिनीसोबत संवाद साधताना अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सई ताम्हणकरसोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केले. तो म्हणाला कि, ‘सई माझी खूप जवळची मैत्रीण आहे. जर आयुष्यात कधीही मी हवेत गेलो किंवा डोक्यात हवा जाणं जो असा प्रकार असतो… तो प्रकार कलाकारांच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता असते. असं जर माझ्याबरोबर घडलं मी हवेत गेलो, तर ही एकमेव व्यक्ती आहे जी मला बरोबर सरळ करेल’.
पुढे म्हणाला, ‘ जर मी हवेत गेलो तर, सई मला जमिनीवर अलगद नाही.. तर थोबाडून जमिनीवर फेकू शकते की, बास आता खूप उडलात हवेमध्ये… आता तू जसा आहेस तसा हो! हे स्पष्टपणे सांगण्यासाठी कोणीतरी माझ्या आयुष्यात आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. ही मैत्री अशीच टिकवण्यासाठी मला सईला रोज भेटायची गरज नाही. अनेकदा आम्ही ३ किंवा ६ महिन्यांनी भेटतो. त्यामुळे असं रोज नाही भेटलो तरीही आमची मैत्री तशीच आहे’. असे हे घट्ट दोस्त आता श्रीदेवी प्रसन्न या आगामी चित्रपटातून आपल्या अफलातून केमिस्ट्रीचे प्रदर्शन करण्यास सज्ज झाले आहेत. माहितीनुसार, हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.