सेवा परमो धर्मः !! ‘NDA’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘PB ग्रुप’च्या वतीने शॉर्टफिल्मची निर्मिती; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ने (NDA) नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘NDA’च्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाला बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे.

देश रक्षणासाठी तिन्ही संरक्षण दलात सक्षम आणि प्रशिक्षीत अधिकाऱ्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आर्मी, नेव्ही आणि एयरफोर्समधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली त्यावेळी म्हणजेच 1949 साली ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची (एनडीए) स्थापना करण्यात आली. येथे उच्च शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षण एकत्र दिले जाते. येथे 18 ते 19 व्या वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अतिशय शिस्त आणि बाहेरच्या जगापासून लांब, मौज-मजेपासून लांब ठेवत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यावर आधारित हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

6 ऑक्टोंबर 1949 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खडकवासला परिसरात ‘एनडीए’ची पहिली वीट रचली. त्यावेळी हा परिसर घनदाट जंगलाचा होता. तिन्ही सेनांच्या प्रशिक्षणासाठी हा परिसर अतिशय चांगला होता. त्यामुळे या ठिकाणी या अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू खडकवासला येथील जंगलाचे आता शहरात रूपांतर झाले. अशाच बदलत्या काळात ‘NDA’मध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, त्यांना संरक्षण दलाचे अधिकारी कसे बनवले जाते, याची माहिती या लघुपटातून देण्यात आली आहे.