‘एवढ्या लवकर संपायला नको होती..’; ‘या’ मालिकेला निरोप देताना प्रेक्षक झाले भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यात अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यामध्ये काही अशा मालिका होत्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तर काही मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि पसंती न मिळाल्याने त्या बंद कराव्या लागल्या. शिवाय काही मालिकांचे कथानक चांगले होते पण टीआरपी कमी असल्यामुळे वाहिन्यांनी त्या मालिका बंद केल्या. अशातच काही दिवसांपूर्वी आणखी एक मालिका ऑफ एअर गेली. या मालिकेचे नाव आहे ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’.

गेल्यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ या अध्यात्मिक मालिकेतून सिंधुदुर्गातील आरवली गावचे ग्रामदैवत ‘श्री देव वेतोबा’ची कथा दाखवण्यात आली होती. ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेत पुढे काय होणार याबाबत कायम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असायची. पण, १४ जानेवारी २०२४ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ज्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. दरम्यान मालिकेतील वेतोबाची भूमिका साकारणारा अभिनेता उमाकांत पाटील याने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानत एक पोस्ट लिहिली आहे.

यात त्याने लिहिलंय, ‘रसिक प्रेक्षकहो, तुमची लाडकी मालिका ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ तुमचा निरोप घेतेय. ज्याची कुठेतरी सुरुवात आहे, त्याचा शेवट असतोच आणि तो योग्य वेळी घेतलेला कधीही चांगला. पण आपल्यात जो अनादी धागा आहे – वेतोबा, तो कायम आपल्यासोबत असणार आहे’. यासोबत उमाकांतने मालिकेचा शेवटचा प्रोमो शेअर केला आहे. या पोस्टवर एकाने लिहिलं, ‘एवढ्या लवकर संपेल अशी अपेक्षा नव्हती…असो खूपच सुंदर मालिका होती’. शिवाय अनेकांनी मालिकेचा पुढील भाग आणा, अशी मागणी केली आहे.