‘डिलिव्हरी बॉय’ घेऊन येतोय धमाल एंटरटेनमेंट आणि जॉय; चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या टिझर आणि गाण्याने सोशल मीडियावर धमाल केल्यानंतर आता चित्रपटाचे एक नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर फारच गमतीशीर आणि लक्षवेधी ठरले आहे. मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या पोस्टरमध्ये अभिनेता प्रथमेश परबच्या हातातील गिफ्ट बॉक्समध्ये एक छोटंसं गोंडस बाळ दिसत आहे. तर त्याच्या बाजूला MHJ फेम अभिनेता पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अभिनेत्री अंकिता लांडे पाटील दिसते आहे. आता हे पोस्टर पाहून प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार आहे का..? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी थेट सिनेमागृहात मिळणार आहे. सिनेमाचे पोस्टर इतके गंमतीशीर आहे तर सिनेमा कसा असेल..? हे पाहायला प्रेक्षक आतुर झाले आहेत.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.’’