‘पश्चिम रंग पूर्व रूप’ नाटकाला मिळाला डिजिटल प्लॅटफॉर्म; प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार मराठी ब्रॉडवे शो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक, संगीत, लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला. हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीनेही हातभार लावला आहे. नुकतेच प्लॅनेट मराठीवर ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) हे नाटक प्रदर्शित झाले आहे. बेसमेंट थिएटर शिकागो निर्मित या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना विद्या जोशी यांची असून याचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले आहे तर लेखन चिन्मय केळकर यांचे आहे.

विजय केंकरे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या नाटकाचे संयोजक व व्यवस्थापक रवि जोशी आहेत. प्रियांका पारेख यांनी मुख्य नृत्य दिग्दर्शिका हि जबाबदारी लीलया सांभाळली. स्नेहा चाफळकर, मंदार पित्रे, संजय सवकूर, नितीन जोशी, सौरभ नेकलीकर, नितीन जोशी, मधुरा साने, कल्पना नेकलीकर, धनंजय काळे, संजय सवकूर, सुनील मुंडले, केतन राईलकर, जयदीप बुझरूक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कलाकृती प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहाता येणार आहे.

याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”मराठी नाटकांवरचे मराठी माणसाचे प्रेम सर्वश्रुतच आहे. वेगवेगळ्या शैलीच्या नाटकांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच स्वीकारले आहे आणि प्रोत्साहनही दिले आहे. मग ते पारंपरिक असो की प्रयोगक्षम! रंगदेवता आणि रंगभूमी ही एकमेकांची परस्परविरोधी रूपं आहेत की एका नाण्याच्या दोन बाजू? की एक दुसरीचं नवं प्रगत रूप आहे? हे कोडं यात उलगडून दाखवलं आहे आणि त्यानिमित्ताने मराठी नाट्यभूमीच्या जडणघडणीचा रंजक आढावा ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ या नाटकातून घेण्यात आला आहे. आम्हाला आनंद आहे, ही इतकी दर्जेदार कलाकृती आमच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे’.