हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र असले तरीही याच पात्रामुळे संपूर्ण मालिका सतत चर्चेत असते. अलीकडच्या भागात अनिरुद्धचं पितळ सर्वांसमोर उघड पडल्यानंतर सगळ्यांनीच त्याच्याकडे पाठ वळवली आहे. या प्रकाराने वीणा आणि संजना दोघीही दुखावल्या आहेत. संजनाचं दुःख पाहून आता अनिरुद्धची आई म्हणजेच कांचन ताईंनी तिला अनिरुद्धच्या सोडून वेगळं हो असा सल्ला दिला आहे. याशिवाय झालेल्या प्रकारानंतर आता अनिरुद्ध पुन्हा एकदा ईशा आणि अनिशच्या लग्नाला विरोध दर्शवताना दिसू लागला आहे. ज्यामुळे आता ईशा घर सोडणे किंवा जग सोडणे इतकेच पर्याय असल्याचे म्हणत टोकाचा विचार करताना दिसेल. ईशा झोपेच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न करताना अरुंधती पोहोचेल आणि तिच्या कानशिलात लगावत तिची समजूत काढेल.
यावेळी अरुंधती ईशाला समजावेल कि, ‘मी तुझी आई आहे आणि मी तुझ्या सुखाचाच विचार करेन’. तेवढ्यात घरातील इतर सदस्य तिथे पोहोचताच ईशा सांगेल कि, ‘मला आत्महत्या करायची नव्हती फक्त बाबांना घाबरवायचे होते’. यावर तिला सगळेजण समजवात की खोटं वागून अनिरुद्धला समजवता येणार नाही. प्रसंगी अनिरुद्धच्या विरोधात जाऊन आम्ही तुझं आणि अनिशचं लग्न लावून देऊ. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की, ‘याचा उपयोग होणार नाही. माझा निर्णय बदलणार नाही. ईशाच्या नाटकांमुळे तर अजिबात निर्णय बदलणार नाही’. दुसरीकडे अनिश ईशाच्या काळजीत त्रस्त असतो. यावेळी वीणा- आशुतोष त्याला खूप समजवतात. अनिश ईशाच्या बाबांना समजवण्यासाठी त्यांचे पाय धरायलाही तयार असतो. पण वीणा म्हणते, ‘मला ही गोष्ट अजिबात पटणार नाही. अनिरुद्धसारख्या व्यक्तीकडून व्हायचा तेवढा अपमान पुरे झाला’. या सगळ्याचा दोष ती स्वत:ला देते. तिला असं वाटतं की ती जर इथे आलीच नसते, तर अनिरुद्धला या गोष्टी करण्याची संधी मिळालीच नसती.
यावर अनिश सांगतो, ‘असं नाहीये. ईशाच्या बाबांना सुरुवातीपासून हे नातं मान्य नव्हतं. त्यांना आता फक्त संधी मिळाली’. यावेळी अनिष्ट अरुंधतीवर विश्वास दाखवतो आणि म्हणतो, ‘त्या सगळं नीट करतील’. दुसरीकडे अरुंधती अनिरुद्धला जाब विचारते, ‘तुमचा राग जर माझ्यावर असेल तर त्याची शिक्षा मुलांना का?’ तरीही अनिरुद्ध ठाम म्हणतो कि, ‘अनिश अजिबात भरवशाचा नाही. जसं माझ्या हातातून सगळं काढून घेतलं तसं तुम्ही माझ्या मुलीच्या हातातून सगळं हिरावून घ्याल’. या गोष्टीला घरातील सगळे विरोध करतात पण तरीही अनिरुद्ध निर्णय बदलत नाही. शेवटी संजना म्हणते, ‘तुला हवं तसं तू वाग, आम्हाला हवं तसं आम्ही वागतो, बघूया तू एकटा काय करतोस. हे लग्न होऊ नये म्हणून वाट्टेल ते कर, मी हे लग्न व्हावं म्हणून वाट्टेल ते करेन. बघूया कोण जिंकतंय?’