हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज देशभरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत नुकताच प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोळ्या जल्लोषात पार पडला आहे. यानिमित्त अयोध्या नगरीच नव्हे तर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज या शुभ प्रसंगी ठिकठिकाणी श्री प्रभू रामाचे पूजन करण्यात येत आहे. दरम्यान मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील त्यांच्या घरी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्याचे समोर आले आहे. याचा एक सुंदर व्हिडीओ त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रवीण तरडे यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आज अयोध्या मंदिर सोहळ्यानिमित्त तरडे दांपत्याने आपल्या घरी श्रीरामाची प्राण प्राणप्रतिष्ठापना केली आहे. याचा व्हिडीओ स्नेहल यांनी शेअर केला आहे. ज्यात अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती असलेली सुंदर रांगोळी तसेच पारंपरिक सजावट केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी खास कॅप्शन दिले आहे.
स्नेहल तरडे यांनी लिहिलंय, ‘सीतापती प्रभू श्रीरामचंद्र यांस साष्टांग दंडवत प्रभू, त्रेतायुगात तुम्ही १४ वर्षे वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल ४९६ वर्षांसाठी वनवासात धाडले. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु, ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केले. नि:शस्त्र भक्तांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यावेळी प्राणांची आहुती दिलेल्या भक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीदेखील लाल झाले’.
‘कलियुगातील रामायणाचा हा रक्तरंजित अध्याय संपवून, राक्षसी वृत्तींचा पराभव करुन अखेरीस तुम्ही स्वगृही अयोध्येस परतत आहात… प्रभू तुमचे स्वागत असो! आज आम्हा समस्त सनातन हिंदू धर्मियांना, तुमच्या भक्तांना अपार आनंद होतो आहे. तुम्ही अयोध्येस परत आलात म्हणजे आता या भारत वर्षात रामराज्य पुन्हा सुरु झाले आहे असेच आम्ही सर्वजण मानतो. कलियुगातील या रामराज्यात भारत देश धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक या सर्व स्तरांवर प्रगतीशील होवो, येथे समृद्धी नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना… सीतापती श्रीरामचंद्र की जय! सनातन हिंदू धर्म की जय! यतो धर्मस्ततो जयः!!’