मन झुलतया गात गानी.. ‘कुन्या राजाची गं तू रानी’; नव्या मालिकेतून ‘गुंजा’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील अतिशय गोड चेहरा, सुंदर हास्य आणि मधुर आवाज असलेली अभिनेत्री शर्वरी जोगने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आतापर्यंत ‘जीव झाला येडापीसा’, ‘जाऊ नको दूर बाबा’ अशा मालिकांमधून ती अत्यंत लक्षवेधी आणि महत्वाच्या भूमिका साकारून प्रकाश झोतात आली आहे. एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून तिने अनेक विविध ढंगाच्या सहाय्यक, महत्वपूर्ण अशा विविध वळणाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता ती आगामी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

प्रत्येक कलाकाराला आपण मुख्य भूमिकेत दिसावं असं वाटत असत. अशीच ईच्छा शर्वरीची सुद्धा होती आणि अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शर्वरी लवकरच एका नव्या मालिकेतून मुख्य नायिकेच्या भूमिकेतून आपल्या भेटीस यायला सज्ज झाली आहे. या मालिकेचे नाव ‘कुन्या राजाची गं तू रानी’ असे आहे. या मालिकेत शर्वरी ‘गुंजा’ नामक मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. गावातल्या, मातीतल्या माणसांचं जगणं, वागणं याच्याही पलीकडे त्यांच्यातील साधेपण नेमकेपणाने दर्शवणारी हि मालिका आहे. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ हि नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १८ जुलै २०२३ पासून सुरू होतेय. या मालिकेत तिच्यासोबत ‘या फुलाला सुंगध मातीचा’ फेम अभिनेता हर्षद अटकरी मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

मालिकेत आपली छोट्याश्या खेडेगावात राहणाऱ्या मोठी स्वप्न पाहणाऱ्या गुंजासोबत भेट होणार आहे. भूमिका साकारणारी शर्वरी म्हणाली, ‘स्टार प्रवाहने दिलेली ही संधी माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे. गुंजाबद्दल सांगायचं तर अतिशय खेळकर, निखळ आणि आत्मविश्वासू असं हे पात्र आहे. तिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. गुंजा डोंगरवाडीची भाषा बोलते. तिचे काही खास शब्द आहेत. मी मुळची कोल्हापूरची असल्याने गुंजाची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. गुंजाचा लूक वेगळा आहे. गुंजामुळे माझी पाण्याची आणि उंचीची भीती पळाली. मी पाण्यातही शूट केलंय आणि ६० फूट उंच टाकीवरही. सायकल चालवायलाही शिकले. त्यामुळे गुंजा या पात्राने मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलंय’.