हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याआधी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले होते. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा विशेष वाढलेली दिसली. यानंतर आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ज्यात सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत आहेत. मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार.
या नव्या पोस्टरमध्ये चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या कलाकारांचे आनंदी चेहरे आणि त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवण्यात आली आहे. हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये, ‘Friends च्या सोबतीने पार करता येतो कोणताही रोड! FRIENDSHIP म्हणजे आयुष्यातलं लखलखतं गोल्ड…’ असे लिहिण्यात आले आहे. येत्या ८ मार्च २०२४ रोजी ‘कन्नी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
‘कन्नी’ या आगामी मराठी चित्रपटाचे लेखन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. आपल्या नव्या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक आणि लेखक समीर जोशी म्हणाले कि, ‘ज्याप्रमाणे ‘कन्नी’ जशी पतंगाला बांधून ठेवते तशीच ही कन्नी सुद्धा मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी आहे. सर्व वयोगटाला आवडेल असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात धमाल आहे, इमोशन्स आहेत. हे सगळे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे’.