‘मी मराठा नाही चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण…’; आरक्षणाच्या मुद्द्यावर केतकी चितळेची पोस्ट.. नेटकरी म्हणाले, ‘तू गप्प बस!!’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या वक्तव्यांसाठी आणि सोशल मीडियावरील पोस्टसाठी चर्चेत असते. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र तिची चर्चा काही कमी होत नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरते. आपली परखड मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडियाचा वापर करताना दिसते. आज, प्रजासत्ताक दिनादिवशी केतकीसोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडीओ शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय कि, ‘या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान’. या व्हिडीओमध्ये केतकी पालिकेकडून जातींचा सर्व्हे करायला आलेल्या महिलेला काही प्रश्न विचारताना दिसते.

या महिलेला ‘तुम्ही जात विचारायला का आला आहात?’ असं केतकी विचारते. यावर ती महिला म्हणते की, मराठा आरक्षणासाठी सर्व्हे सुरू आहे. यावेळी ती महिला केतकीला ‘तुम्हीपण मराठा आहात का..?’ असं विचारते. यावर केतकी म्हणते, ‘अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे’. यानंतर ती महिला जाते आणि अभिनेत्री म्हणते, ‘प्रत्येक नागरिकाला समान कायदा नाहीये. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सर्व्हे सुरू आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, ‘तुम्ही पण मराठा आहेत का? असं विचारलं तर जितक्या झटकन ‘अजिबात नाही’ म्हणून ‘ब्राह्मण’ आहे असं सांगितलं. यावरून कळतं की तुमचा मराठा जातीबद्दल किती द्वेष आहे व स्वतःच्या जातीचा किती अभिमान आहे…तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये?’

यावर केतकीने प्रत्युत्तर देत म्हटले कि, ‘मराठा जातीच्या विरोधात मी नाही. तुम्ही कितीही मला तसे रंगवायचा प्रयत्न केलात तरी मी तशी होत नाही. तुम्ही रंगवत राहा काल्पनिक कथा. मी मनोरंजन म्हणून वाचत राहते. सत्य खऱ्या मराठाला माहिती आहे की मराठा व ब्राह्मण हे १९९० पर्यंत एकच होते. कुणी तेढ निर्माण केली हे ही सर्वांना महिती आहे. आता मराठा समाजात कोण तेढ निर्माण करतंय हे ही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या गटातील आहात, ते दाखवून दिल्याबद्दल तुमचे आभार’. आणखी एकाने लिहिलंय, ‘#कोकणस्थचित्पावनब्राम्हण सांगण्या पेक्षा #भारतीय बोलल्या असतात तर तेव्हढं बरं झालं असतं…. तुमच्या भाषेतही इथे #जातीयवाद दिसला.. बरं कोकणस्थ बोलणे सोडुन द्या. आमच्या कोकणात जात घरात सोडुनचं बाहेर निघतात’. अन्य एकाने लिहिलंय, ‘तुला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवचरित्राचा आधार घ्यावा लागेल तुला’. केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे.