‘ठरलं तर मग’ मालिकेचे 200 भाग पूर्ण; संपूर्ण टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी छोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. या मालिकेला सुरु होऊन अगदी काहीच काळ लोटला असून मालिकेतील कलाकार, कथानक यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील मुख्य पात्रे म्हणजेच अर्जुन आणि सायली या जोडीला तर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. नुकताच या मालिकेने यशाचा एक टप्पा पार केला आहे. २०० भाग पूर्ण करत हि मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा आता भाग झाली आहे. या निमित्ताने मालिकेची टीम मुंबईच्या सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी गेली होती.

मालिकेला अल्पावधीत मिळालेलं प्रेम हे खरंच आश्चर्यकारक आहे. बघता बघता या मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला आहे. या दिवसाचे खास औचित्य साधत मालिकेची संपूर्ण टीम मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली. यावेळी मालिकेतील कलाकारांसोबत मालिकेचे निर्माते- शिवसेनेचे सदस्य व पक्षाचे सचिव आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकरदेखील उपस्थित होते. याचे फोटो आणि व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ वाहनाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. सोमवारी ‘ठरलं तर मग’ या मालिकेचा २००’वा भाग प्रसारित झाला.

सिद्धिविनायक मंदिरात मालिकेच्या टीमने दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज सादर होत आहे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा २०० वा भाग….या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टिमने मुंबईतील सुप्रसिध्द सिध्दिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन आणि शुभाशिर्वाद घेतले. आपण प्रेक्षकांनी या २०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!’ सध्या या मालिकेचा टीआरपी खूप चांगला आहे. गेल्या आठवड्यात ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेला टक्कर देत हि मालिका अव्वल ठरली. ‘आई कुठे काय करते’ मालिकेला ६.७ रेटिंग आणि ‘ठरलं तर मग’ मालिकेला ६.९ रेटिंग होते.