मराठमोळ्या कलाकाराच्या व्यवसायाची राज ठाकरेंनी घेतली दखल; ‘देवल मिसळ’चे केले कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार मंडळी कला क्षेत्राशिवाय विविध क्षेत्रात सध्या कार्यरत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अनेकांनी हॉटेल लाईनमध्ये पदार्पण केल्याचे समोर आले आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम एका कलाकाराने त्याच्या पत्नीसह सुरु केलेल्या नव्या व्यवसायाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. नुसती दखल नव्हे तर त्यांनी या कलाकाराचं अगदी भरभरून कौतुक केलं आहे. हा कलाकार म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय संगीत संयोजक व संगीतकार तुषार देवल.

नुकताच तुषारने त्याची पत्नी अभिनेत्री स्वातीसह एक नवा व्यवसाय सुरु केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोरिवली पूर्व येथे मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी एक भव्य ‘मिसळ महोत्सव’ सुरू करण्यात आला होता. या मिसळ महोत्सवात तुषार आणि स्वाती यांनी मिळून ‘देवल मिसळ’ नावाचा स्टॉल लावला होता. या स्टॉलला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी कलाकारांच्या या व्यवसायाचे कौतुक केले. हा प्रसंग तुषारने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हि व्हिडीओ पोस्ट शेअर करताना तुषारने लिहिलं आहे कि, ‘पहिल्यांदाच राज साहेबांना एवढ्या जवळून बघितलं… त्यांना आमच्या मिसळीविषयी सांगितलं आणि त्यांनी खांद्यावर हात ठेऊन शुभेच्छा दिल्या… बस्स … अजून काय पाहिजे… एवढ्या गर्दीत २ शब्द ऐकून घेतल्याबद्दल राज साहेबांचे मनापासून धन्यवाद’. दरम्यान, तुषार आणि स्वातीच्या या नव्या व्यवसायाला अनेक कलाकार मंडळी तसेच चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत.