डोक्यावर अक्षता पडणार पण नवरी कुणाची निवड करणार..? ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच ‘लग्नकल्लोळ’ नावाचा एक जबरदस्त हटके कथानक असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मयुरी देशमुख, प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर पाहून प्रेक्षक या धमाकेदार चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. एक जबरदस्त स्टोरी आणि जबरदस्त स्टारकास्ट असलेला ‘लग्नकल्लोळ’ आता सिनेमागृहात कल्लोळ करायला तयार आहे.

या टिझरमध्ये सिद्धार्थ सोबत मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार..? आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे..? याचे उत्तर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटात या प्रमुख कलाकारांसोबत अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. हा लग्नाचा धमाका येत्या १ मार्च २०२४ रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या साक्षीने उडणार आहे. टीझरमधली धमाल चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवते आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे, आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहम्मद बर्मावाला म्हणाले कि, ‘चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्न म्हटले की घरात कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना आहे’.