‘पराकोटीचा अट्टहास व तळमळ…’; हिंदी नाटकात पत्नीचा अभिनय पाहून अभिजीत खांडकेकर गेला भारावून


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अभिजीत खांडकेकर टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मालिकांमध्ये वेगवेगळी पात्र साकारून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अनेकदा ती पत्नीसोबतचे फोटो देखील शेअर करतो. दरम्यान नुकतीच त्याने पत्नी सुखदासाठी एक खास पोस्ट शेअर केली. जी व्हायरल होते आहे.

अभिजीत जितका उत्तम अभिनेता आहे तितकीच त्याची पत्नी सुखदादेखील उत्तम अभिनेत्री आहे. सध्या ती हिंदी नाटक ‘अजातशत्रू’मध्ये काम करतेय. नुकताच अभिजीतने तिच्या या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि यात त्याच्या पत्नीने केलेला अभिनय पाहून तो भारावून गेला. नाटक पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पत्नीचे कौतुक करताना एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय कि, ‘काल इब्सेन फेस्टिवलमधील इला अरुण यांनी रूपांतरीत केलेलं आणि इला अरुण व के.के.रैना सरांनी दिग्दर्शित केलेलं ”अजातशत्रू” हे हिंदी नाटक पाहण्याचा योग आला. अत्यंत गंभीर विषयावरचं पण तितकंच प्रभावीपणे सादर केलेलं नाटक सगळ्यांनी पाहावं असंच आहे’.

पुढे लिहिलंय, ‘या सगळ्यात उठून दिसणारी – सुखदा. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकाच नाटकात दोन पात्रांचा अभ्यास करणं आणि त्या दोन्हींपैकी कुठलं छान साकारलं म्हणून प्रेक्षकांना तितकंच बुचकळ्यात पाडावं हे तूच करू जाणे. प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेच्या तुझ्या मेहनतीचा मी सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे. इतकी मेहनत, इतकं समर्पण, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी म्हणून असलेला पराकोटीचा अट्टहास व तळमळ बघून एखाद्या वर्गात सतत पहिल्या येणाऱ्या मुलीबद्दल जशी असूया वाटते ना तशी वाटते आणि त्याचबरोबर अभिमानही वाटतो. इतकं सगळं करून मंचावरचा तुझा वावर, तुझं सहज ते पात्र होऊन जाणं, हिंदीवरचं प्रभुत्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत नसेल, तर नवलच. खूप प्रेम व प्रचंड आदर’. अभिजीतच्या या पोस्टवर सुखदाने प्रतिक्रिया देत म्हटलंय, ‘तू आहेस म्हणून मी आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे’.