‘तुझ्याविना’ गाण्यातून अवधूत गुप्ते व्यक्त करणार तुटलेल्या मनातील प्रेमभावना; टिझर रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांचा ‘विश्वामित्र’ हा नवाकोरा सॉन्ग अल्बम अत्यंत चर्चेत आहे. या अल्बमचे टायटल सॉन्ग रिलीज झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांनी गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाण झळकला होता. यानंतर आता ‘विश्वामित्र’ अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित होत आहे. ज्याचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

गायक अवधूत गुप्ते यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर शेअर केला आहे. या नव्या गाण्याचे बोल ‘तुझ्याविना’ असे आहे. तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आपल्याला येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी समजणार आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत आणि बोल असलेल्या या गाण्याला आवाजसुद्धा त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.

आपल्या आगामी गाण्याबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले कि, ‘आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी प्रेम होते. कोणाचे प्रेम शेवटपर्यंत टिकते तर कोणाची साथ अर्ध्या वाटेतच सुटते. या माझ्या मित्रमैत्रिणींच्या तुटलेल्या हृदयातील भावना मी या गाण्यातून मांडल्या आहेत. या गाण्यातील कथा, भावना मनात खोलवर भिडणाऱ्या आहेत. जसे प्रेम संगीतप्रेमींनी ‘विश्वामित्रा’च्या पहिल्या गाण्याला दिले, प्रेक्षकांची तीच पसंती या गाण्यालाही मिळेल’.