हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील बऱ्याच मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे मनोरंजनात खंड पडेल असे वाटत असतानाच ‘झी मराठी’वर नव्या मालिका सुरु होणार असल्याचे समोर आले. दरम्यान, ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिका १२ फेब्रुवारी २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्या आहेत. तर ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका देखील लवकरच सुरू होणार आहेत. दरम्यान यातील एका मालिकेत हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस हिंदी फेम अभिनेता राकेश बापट झळकणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
‘बिग बॉस हिंदी’मध्ये झळकल्यानंतर अभिनेता राकेश बापट आता मराठी मालिका विश्वात एंट्री करतोय. ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत तो मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत तो एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार हि भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा पहिला प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यामध्ये राकेशच्या भूमिकेची दमदार झलक दाखवण्यात आली आहे.
या प्रोमोमध्ये, राकेश बापट एका अत्यंत रुबाबदार आणि शिस्तप्रिय भूमिकेत असल्याचे दिसत आहे. त्याच्या नजरेचा कटाक्ष आणि चालण्यातला रुबाब लक्ष वेधून घेतो आहे. असा हा अभिराम जहागीरदारच या मालिकेचा हिटलर असून याची नवरी नेमकी कोण असेल..? हे जाणून घेण्यासाठी मालिकेच्या पुढील अपडेट्सच्या उत्सुकता आहे. आलिशान घर, गाडी आणि श्रीमंतीने न्हाहलेला हिटलर अभिराम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयीची उत्सुकता बळावली आहे. राकेशने, ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटातही तो झळकला आहे.