हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात महानगरपालिकेचे कर्मचारी जातीय सर्वेक्षण करताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन माहिती जमा करत आहेत. आपल्याला जात विचारली म्हणून अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी आगपाखड केली होती. दरम्यान, ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर २ लाथा घातल्या असत्या’, असे विधान करून पुष्करने वाद ओढवून घेतला. वाद वाढल्याचे लक्षात येताच त्याने माफी मागितली पण तोपर्यंत पुष्करची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे अनेक नेटकरी आणि कलाकारांनी संताप दर्शवला. यामध्ये किरण माने, अभिजित केळकर आणि मेघा घाडगे यांचा समावेश आहे.
अभिजित केळकरचे पालक बीएमसी कर्मचारी असल्यामुळे पुष्करच्या पोस्टवर त्याने संताप दर्शवला होता. यानंतर आता अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टच्या सुरुवातीला BMC आणि महिला सन्मान असे हॅशटॅग तिने दिले आहेत. यापुढे कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार…??? बाई माणुस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या…??? तुला २ लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहाता वाईट वाटलं. कारण जात बघुन मैत्री करणारा तु… विचारांनमध्येच घाण.. काय करणार..?’
पुढे लिहिलंय, ‘अरे मित्रा …. त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा. आजूबाजूला थोडी चौकशी करावी….! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे. तो मी नक्कीच तुला पाठवेन. ते ही नको हव असेल तर तुझ्याच जातीची काही माझे मित्र मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर .. वा घाण …वा घाण … वा घाण ..!’. मेघाच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, ‘मेघा ताई तुझ्या शब्दातून तू दोन लाथा ही घातल्या आणि दोन बुक्या ही दिल्या’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘अश्या विकृती वेळेवर आवर घातला पाहिजे’.