रोहिणी हट्टंगडी आणि दिलीप प्रभावळकरांचा ‘आता वेळ झाली’ सिनेमा ‘या’ दिवशी रिलीज होणार; इच्छामरणावर भाष्य करणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित आणि लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या चित्रपटाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर आपल्याला २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट आल्यावरच कळणार आहे.

इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन हे निर्माते आहेत. तर या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल बोलताना अनंत नारायण महादेवन म्हणाले कि, ‘जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले’.

पुढे म्हणाले, ‘जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरूवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. भौतिकवादी दृष्टीकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टीकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरूणाईला नक्कीच कळेल’. डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेल झाली’ची यापूर्वीच निवड झाली आहे.