‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. यानंतर आता लवकरच सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार गड आला पण…’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच याचा टिझर लॉन्च झाला आहे.

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार’ या चित्रपटाचा नुकताच टिझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा ऐतिहासिक चित्रपट येत्या २३ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या माता जिजाऊंच्या भूमिकेत आपल्या भेटीस येणार आहेत. सुभेदार या चित्रपटाचा टिझर लॉन्च करतेवेळी, ‘आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’! २५ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा…’ अशी घोषणा निर्मात्यांनी केली आहे.

आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘सुभेदार’चे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चित्रपटाचा टिझर केवळ १ मिनिट ४८ सेकंदाचा असला तरी थक्क करणारा आहे. या टीझरमधील संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोंढाणा (आत्ताचा सिंहगड) किल्ल्याची मोहीम लढण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं’ असे शिवरायांना वचन देत मुलाचे लग्न सोडून मोहीम हाती घेतली होती. हा इतिहास आपण जाणतोच. पण हा इतिहास आता आपल्याला भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते अजय पुरकर साकारणार आहेत.