रितेश- जिनीलियाचा ‘वेड’ पाहता येणार टिव्हीवर; ‘या’ वाहिनीवर होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखची जोडी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचा वैयक्तिक जितका मोठा चाहता वर्ग आहे त्याहून मोठा चाहता वर्ग त्यांच्या जोडीचा आहे. रितेश आणि जिनीलिया दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या अभिनय कलेने आजतागायत त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. पण दोघांचा ‘ वेड ‘ हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावणारा ठरला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. शिवाय ओटीटीवरदेखील हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. यानंतर आता हा चित्रपट टिव्हीवर पाहता येणार आहे.

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. बॉलिवूडचे सिनेमे देखील ‘वेड’समोर फ्लॉप ठरले. असा हा सिनेमा आता लवकरच टिव्हीवर येतोय. याबाबत स्वतः अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. वेड हा चित्रपट पहिल्यांदाच टीव्हीवर लागणार आहे. यासंदर्भात रितेशने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यानुसार, ‘वेड’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ शो हा येत्या २० ऑगस्ट २०२३ रोजी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

सिनेमा थिएटर आणि ओटीटी प्रक्षेपणानंतर रितेश आणि जिनिलियाचा ‘वेड’ हा चित्रपट आता टेलिव्हिजन प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे जिनिलीयाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते आणि तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले होते. तर अभिनेता रितेश देशमुख यांनी वेड चित्रपटात केवळ काम केले नाही तर या निमित्ताने त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

‘वेड’ चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलिया मुख्य भूमिकेत तर अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत ७५ कोटींहून अधिक कमाई करणारा ‘सैराट’नंतर हा दुसरा चित्रपट ठरला होता.