‘निंदकाचे घर असावे शेजारी..’; भाऊ कदमच्या कोकणातील घराच्या ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो आहे. यामधून निलेश साबळे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, अंकुर वाढवे, सागर कारंडे आणि अविभाज्य भाग असलेला भालचंद्र कदम अर्थात भाऊ गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. हे सर्व कलाकार प्रेक्षकांचे अतिशय लाडके आहेत. त्यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. यांपैकी भाऊ कदमचं फॅन फॉलोईंग तर तुफान आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फार सक्रिय नसूनही भाऊचे चाहते त्याच्याविषयी छोट्यातली छोटी माहिती जाणून घेत असतात. सध्या भाऊ कदम त्याच्या कोकणातील गावी गेला आहे आणि गावच्या घराचा एक फोटो त्याने शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता भालचंद्र कदम अर्थात भाऊ हा मूळचा कोकणातील कणकवलीमधील नांदगावचा आहे. सध्या तो गावी याच ठिकाणी निवांत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. यावेळी भाऊने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर गावातील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका फोटोत भाऊ कदमबरोबर त्याचा भाऊ दिसत आहे. तर त्याने आणखी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यात दोघेही भाऊ खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या फोटोत भाऊचं गावातील अतिशय सुंदर असं जुनं कौलारू घर दिसतं आहे. घराच्या बैठकीत दोघे भाऊ खुर्चीत निवांत बसलेले आहेत. पण या फोटोत भाऊपेक्षा या घरातील एका फळीवर लिहिलेली ती दोन वाक्य जास्त चर्चेत आली आहेत.

भाऊ कदमने शेअर केलेल्या या फोटोत त्याच्या गावातील घराचे वासे लाकडी असल्याचे दिसत आहे. सोबतच एक जुना टीव्ही आणि थोडं फार सामान दिसत आहे. मुख्य म्हणजे भाऊ कदमने शेअर केलेल्या या फोटोत तो आणि त्याचा भाऊ दोघेही सेम टू सेम दिसत आहेत. ज्यामुळे दोघांना पटकन ओळखणे अशक्य आहे. मात्र या फोटोचे नेटकऱ्यांनी जेव्हा बारकाईने निरीक्षण केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि घराच्या लाकडी वाशावर एक मजकूर लिहिला आहे. या मजकुरात, ‘मनाचे मोठेपण आईच्या हाती असते’ आणि ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी दोन वाक्ये लिहिलेली दिसत आहेत. या दोन वाक्यांनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.