‘सारं काही तिच्यासाठी..’; झी मराठी वाहिनीच्या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| झी मराठी वाहिनी ही अत्यंत लोकप्रिय अशी वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. यातील ३ मालिका सलग बंद होत असल्याच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. केवळ टीआरपी कमी असल्यामुळे झी मराठीवरील एक नव्हे तर तब्बल तीन मालिका सांगतेकडे मार्गस्थ झाल्या आहेत. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘लवंगी मिरची’ या मालिकांचा समावेश आहे. तर सोशल मीडियावर झी मराठीच्या आगामी मालिकेच्या प्रोमोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सध्या झी मराठीची ‘३६ गुणी जोडी’ हि मालिका चांगली रंजक वळणावर आहे. पण केवळ टीआरपी कमी असल्यामुळे हि मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेची जागा आता ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका घेणार आहे. या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कारण हि मालिका भावभावनांच्या बंधांवर आधारलेली आहे. या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत आणि अभिनेता अशोक शिंदे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. येत्या २१ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता ही झी मराठीवर सुरु होणार आहे.

नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये दोन सख्ख्या बहिणींची भावनिक गोष्ट दाखवण्यात आल्याचे समजत आहे. वीस वर्षांपूर्वी काही कारणामूळे या दोन सख्ख्या बहिणींची ताटातूट झाली आहे. त्यापैकी एक बहीण कोकणात गावामध्ये स्थायिक आहे. तर दुसरी परदेशात वास्तव्यास आहे. मालिकेत कोकणातील बहीण आपल्या लहान बहिणीचा फोटो पाहून तिची आठवण काढताना दिसते. तर दुसरी बहीण मैत्रिणीसोबत बोलताना बहिणीच्या आठवणीत रमली आहे. इतकं प्रेम असूनही या दोन बहिणी का दुरावल्या आहेत..? असं काय घडलं असेल..? त्या पुन्हा जवळ येतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हि मालिका पाहिल्यावर समजतील.