‘थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर..’; मणिपूर घटनेबाबत मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मणिपूरमध्ये घडलेल्या घृणास्पद कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी काही पुरुषांनी आदिवासी समाजातील २ असहाय महिलांना निर्वस्त्र करत त्यांची नग्न धिंड काढली. इतकेच नव्हे तर पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. यावर अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे. ज्यामध्ये परखड आणि स्पष्ट स्वभावाची ओळखल्या जाणाऱ्या हेमांगी कवीचा देखील समावेश आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हेमांगीने लिहिलंय कि, ‘मणिपुर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं..? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं..? बाप रे! इथं सोशल मीडियावर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती क्लिप आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर..?’

या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, ‘घडतंय, घडलंय ते भयंकर आहे. माणूस प्रगत होतोय, सर्वच बाजूंनी अमानुषपणातही आणि असंवेदनशीलपणातही कोणालाच काहीच पडलेली नाही इथे. फक्त पैसा सत्ता खुर्ची आणि आपमतलब बास. सगळेच जनतेच्या भावनांवर, आणि आपापसातील हेव्यादाव्यांवर आपापली रोटी शेकून घेत आहेत’. तर आणखी एकाने म्हटले कि, ‘त्यासाठी रस्त्यावर यावे लागते आणि आंदोलन विरोध करायला रस्त्यावर सामान्य माणूसचं येतो… आणि त्यासाठी काळीज लागत काळीज…! उगाच formality म्हणून काही तरी पोस्ट करायची बस्स… संपलं..!’. याशिवाय आणखी एकाने म्हटले, ‘स्त्री च्या चारित्र्यावर घाला करणे खूप सोपे असते म्हणून येथील पुरसत्ताक संस्कृती तिच्यावर घाला करते’.