माझ्या धर्माचं वर्म नेमकं काय..? किरण मानेची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. शिवाय ते विविध विषयांवर आशयघन पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट या नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अत्यंत मार्मिक शब्दात ते विषयांची मांडणी करतात आणि म्हणूनच त्यांच्या पोस्ट नेहमीच वाचनीय ठरतात. आताही किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी गेल्या २ दिवसांपासून व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘…स्वातंत्र्यपूर्व काळातले ब्रिटीश अधिकारी म्हणजे क्रूर, अन्यायी, अत्याचारी असा आपल्याकडं सरसकट समज आहे. काही अंशी ते खरंही होतं… पण त्यांच्यामध्ये काही अतिशय लोभस वृत्तीचे, माणुसकीचा झरा हृदयात असणारे अधिकारीही होते. त्यातलेच एक अलेक्झांडर ग्रॅंट. ग्रॅंट साहेबाच्या हातात ‘तुकाराम गाथा’ लागली. त्यातले अभंग वाचून, समजून घेतल्यानंतर हा अधिकारी अक्षरश: भारावून गेला. तुकोबावेडानं झपाटला. १८६९ साली, तुकाराम गाथेची संशोधित आवृत्ती छापण्यासाठी ब्रिटीश सरकारकडून तब्बल चोवीस हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देणारा अलेक्झांडर ग्रॅंटसारखा अधिकारी, नंतरच्या काळात वारकरी संप्रदायाची पताका जगभर घेऊन गेला!’

‘…त्याकाळात भारतात ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी मिशनरी यायचे. उघडउघड भर रस्त्यात कुणालाही न घाबरता, ‘आमचा धर्म कसा महान. तो स्विकारण्याचे फायदे काय.’ यावर प्रवचनं द्यायचे. लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करायचे. अशा मिशनर्‍यांना ग्रॅंटसाहेबांनी त्या तुकाराम गाथेच्या प्रस्तावनेत एक मार्मिक टोला लगावला आहे. ते म्हणतात, “तुकोबा हे महाराष्ट्राचे महान राष्ट्रकवी आहेत. महाराष्ट्रातल्या ज्या माणसांच्या मुखामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, तो कधीच स्वत:चा धर्म सोडणार नाही. त्याला धर्मांतर करायला लावण्यात तुम्ही शक्ती वाया घालवू नका. कारण तुकोबारायांचा धर्म फक्त मानवता शिकवतो. माणसात देव पहायला शिकवतो…”’

‘…एका परकिय माणसाला तुकोबारायाची शिकवण भावली. त्यानं ती त्याच्या माणसांपर्यंत पोहोचवली. आपल्याला आपल्या आईच्या भाषेत असलेलं हे साधंसोपं, पण अफाट आणि अगाध ज्ञान समजून घ्यायला कसली अडचण आहे? तुकोबाराया मनामेंदूत मुरलेल्या माणसाचं माथं कुठल्याबी पोकळ व्हाॅटस् ॲप मेसेजनं भडकणार नाय. तुकोबांचे अभंग अनुभवलेला माणूस कायम कुठल्याही ‘ऐकलेल्या,वाचलेल्या’ गोष्टीच्या खोलात जाईल – दुधातून पाणी वेचून वेगळे करेल – आणि मगच त्यावर बोलेल. गाथा समजलेला माणूस दुसर्‍या माणसात जातधर्म नव्हे, तर विठ्ठल पाहील’.
‘माझ्या धर्माचं वर्म नेमकं काय’ हे समजून न घेता ऐकीव माहितीवर वाद घालणार्‍यांना तुकोबा म्हणतात,
“तुका म्हणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळता ‘वर्म’ मिथ्यावाद ।।”

  • किरण माने.