घटस्फोटाच्या चर्चांमुळे मधुराणी अस्वस्थ; अभिनेत्रीच्या पतीने सांगितले सत्य.. म्हणाले, ‘आमच्या नात्यामध्ये..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी गोखले प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणीला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे मधुराणीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तिच्या चाहत्यांना जाणून घेण्यात नेहमीच रस असतो. दरम्यान मधुराणी प्रभुलकर तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी मधुराणीच्या पतीने प्रतिक्रिया देत या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मधुराणीच्या वैवाहिक आय़ुष्यात वादळ आल्याचे बोलले जात होते. यासगळ्या प्रकरणावर मधुराणीचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी काही माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सध्या सोशल मीडियावर ज्या घटस्फोटाच्या बातम्या व्हायरल होत आहे त्या अफवा असून त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. आमच्या नात्यामध्ये दुरावा नाही. माध्यमांनी बातमी देताना काळजी घ्यावी. त्यातून विनाकारण बदनामी होणार नाही याची दखल घ्यावी. त्यातून आम्हाला मनस्ताप होतो’.

त्याच झालं असं कि, अभिनेत्री मधुराणी गोखले- प्रभुलकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांच्या मिरॅकल अॅक्टिंग अॅकडमीसोबत कार्यरत राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ही अॅक्टिंग अॅकडमी त्यांचे पती प्रमोद आणि मधुराणी यांनी सोबत सुरु केली होती. मात्र मधुराणीच्या निर्णयाने सर्वांना चकित केले आणि तेव्हापासून तिच्या वैवाहिक आयुष्यात आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांचा वेग इतका वाढला कि थेट घटस्फोटाच्या चर्चांपर्यंत येऊन पोहोचला.