हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईचा वडापाव जितका प्रसिद्ध आहे तितकीच मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था कायम चर्चेत असते. मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठाले खड्डे वाहनधारकांना फार त्रासदायक ठरतात. कुठे प्रवास करायचं म्हटलं कि आधीच कंबरेला आणि मानेला ‘सज्ज व्हा…’ असे सांगावे लागते. अशा रस्त्यांमुळे प्रवासाची मजा आधीच निघून जाते. ज्याचा सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच वैताग आला आहे. अनेक कलाकार मंडळी याबाबत व्यक्त होत असतात. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने यावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. निरनिराळ्या पोस्ट शेअर करत ती सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. केवळ कामाचे अपडेट्स नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगदेखील ती आवर्जून शेअर करताना दिसते. आताही शेअर करत सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता रिक्षात बसल्याचे दिसत आहे. यामध्ये तिने तोंडाला स्कार्फ बांधल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओसोबत मुक्ताने एक भन्नाट कॅप्शन शेअर केले आहे. मुक्ताने लिहिलंय, ‘आता आपण शिकुया ”बसल्याजागी करायचा नाच” – यासाठी लागणारं साहित्य रिक्षा, खड्डे आणि खड्यातून वाट काढत जाणारा रस्ता’. या व्हिडिओसोबत मुक्ताने रोड, सेफ्टी, रिक्षा, मुंबई आणि ट्रॅफिक असे हॅशटॅग दिले आहेत. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत मुक्ता बर्वेने मुंबईतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर भाष्य केले आहे. मुक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो आहे. मुक्ताच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.