‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु; गुपचूप उरकला साखरपुडा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले आहेत. यांपैकी एका अभिनेत्रीने नुकताच आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेत ‘आरोही’ या पात्राची एन्ट्री झाली. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री कौमुदी वलोकरने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे समोर आले आहे.

२०२३ वर्षा अखेरीस कौमुदीने आपल्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला आहे. कौमुदीचा ३१ डिसेंबर २०२३ रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला आणि या सोहळ्याचे खास फोटो तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

थेट फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना जोडीदार निवडल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री कौमुदी वलोकरने अगदी २ दिवसाआधी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने होणाऱ्या नवऱ्यासोबतच फोटो शेअर केला होता. सोबत लिहिलं होतं कि, ‘उद्या आपल्या आयुष्याचे पोस्टर उघड होत आहे’. पण नेमकं काय..? याबद्दल तिने सांगितलं नव्हतं.

यानंतर रविवारी ३१ डिसेंबर रोजी तिने थेट साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘या वर्षाच्या शेवटी आम्ही आमचा नवा अध्याय सुरू करत आहोत’. अभिनेत्री कौमुदी वलोकरचा साखरपुडा आकाश चौकसेसोबत थाटामाटात पार पडला आहे. कौमुदीचा होणारा नवरा पीएचडी धारक आहे आणि तो कॅलिफोर्नियातून शिक्षण घेऊन मायदेशी परतला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याची फोटो आणि व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले आहेत. कौमुदीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी तसेच चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.