‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट का पहावा..? आस्ताद काळेने दिली ‘ही’ महत्वाची कारणं


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेले काही दिवस मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस कथानक असूनही या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा संमिश्र प्रतिसाद पाहून मराठी अभिनेता आस्ताद काळे याने हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हा चित्रपट का पहावा याची काही ठोस कारणे दिली आहे.

आस्ताद काळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने लिहिलं आहे कि, ‘आत्मपॅम्फ्लेट…मी काही कोणी मोठा नाही. पण तरीही सांगतो. हा चित्रपट बघायलाच हवा याची काही ठोस कारणं (माझ्या मते):-
1) उत्कृष्ट कथाकथन.
2) उत्कृष्ट लिखाण.
3) उत्कृष्ट विषय.
4) त्या विषयाची उत्कृष्ट हाताळणी.
5) उत्कृष्ट कामं(लेखकापासून रंगभूषाकारापर्यंत, दिग्दर्शकापासून spot दादांपर्यंत).
6) आपल्याला आंतरमुख करून, प्रश्न पाडून विचार करायला लावण्याचा एक उत्कृष्टरित्या यशस्वी प्रयत्न’.

यापुढे त्याने लिहिलंय, ‘गेल्या काही वर्षांत मी स्वत: केवळ ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांमधेच कामं केली आहेत. त्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी फार फार उत्तम प्रतिसाद दिला. विशेषत: तरूण प्रेक्षकवर्गानी. आपण इतिहासात पटकन रमतो. त्यातून तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर समस्त महाराष्ट्र अभिमानानी आणि प्रेमानी या ‘आपल्या राजा’साठी भान हरपून बसतो. ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा इतिहासपट नाही. किंवा साधारण 1980-1990मधे जन्मलेल्यांचा ‘इतिहास’ सांगणारा चित्रपट वाटूही शकतो. हे ज्यानी-त्यानी ठरवावं. अर्थात चित्रपट THEATREमधे पाहूनच. मला ही माझी गोष्ट वाटली. तुम्हालाही वाटू शकेल. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘देउळ’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘धुराळा’, हे CINEMA म्हणून मला PATH-BREAKING, किंवा PATH-SETTING वाटले. ‘आत्मपॅम्फ्लेट’ या यादीत नक्कीच जाऊन बसतो. नक्की बघा. THEATREमधेच बघा. ता.क:- तुमच्या भागात हा चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्यास कृपया सांगा’.