हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आस्ताद काळेने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतीच आस्ताद काळेबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. आस्ताद काळेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आईचे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. काही दिवसांपुर्वीच आस्तादच्या आईचे निधन झाले आणि आईच्या आठवणीत अभिनेता भावुक होत व्यक्त झाला आहे. त्याने सोशल मीडियावर काही भावनिक पोस्ट शेअर केल्या आहे.
अभिनेता आस्ताद काळेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर या पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील पहिली पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, ‘ती गेली…. तेव्हा…’. तर पुढच्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘……म्हणुनी… घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून’. सध्या आस्तादच्या या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्याच्या या पोस्ट पाहून चाहते आणि अनेक कलाकार मंडळी देखील भावनिक झाली आहेत. आस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
आस्ताद त्याच्या आईचा लाडका होता. त्यांचे नाते अतिशय घट्ट होते. आस्ताद त्याचे पुर्ण नाव लिहितांनादेखील आईचे नाव लावतो. आस्तादपूर्वी त्याचे वडील प्रमोद काळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत पत्नीच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी पत्नी सुनिता काळे यांचे काही फोटो शेयर करत लिहिले होते की, ‘गूड बाय डियर… पुन्हा कधीतरी नक्की भेटू… तेव्हा राहिलेलं सगळं बोलू…’.