हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Aatmapamphlet) परेश मोकाशी लिखित आणि आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चितपट अलीकडेच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा याभोवती फिरत आहे. कथानक अत्यंत दर्जेदार असूनही प्रेक्षक मात्र या चित्रपटाला आवश्यक प्रतिसाद देईना, हि बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्वीट केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर हे कायम मराठी चित्रपट, कलाकार आणि मराठी सिनेसृष्टीशी संबंधित विषयांवर, समस्यांवर भाष्य करून तोडगा काढताना दिसतात. याहीवेळी त्यांनी अशाच एका विषयाला थेट हात घातला आहे. (Aatmapamphlet) अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिला आणि यावेळी चित्रपटगृहातील एक व्हिडीओ त्यांनी आवर्जून शेअर केला. ज्यामध्ये संपूर्ण चित्रपटगृहात बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक होते. बाकी थिएटर रिकामी होते.
या संदर्भात अमेय खोपकर यांनी ट्वीट करत लिहिलं, ”’आत्मपॅम्फ्लेट” हा मराठी चित्रपट आज बघितला. अतिशय उत्तम सिनेमा आहे, जो भरपूर हसवणूक करतो आणि तितकाच विचार करायलाही लावतो. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांनी पहायला हवा असा झालेला आहे. दुर्दैवाने, आज जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजण सिनेमाहॉलमध्ये होतो. मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे..?’ (Aatmapamphlet)
‘एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळतील नसतील तर नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय, याचा आता निर्माते आणि प्रेक्षक, सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. भविष्यात यासाठी पुढाकार घेऊन जे जे करावं लागेल ते आम्ही करणारच… पण सध्यातरी माझं सर्वांना आवाहन आहे की आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट आवर्जून बघा. असे चांगले चित्रपट मराठीत फार कमी बनतात, जर आत्ता त्यांना आपण प्रतिसाद दिला नाही तर दिवसेंदिवस मराठीची अवस्था आणखी बिकट होत जाईल’. (Aatmapamphlet) ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.