अभिज्ञाच्या घरी अवतरला स्वामीरुपी बाप्पा; Insta’वर फोटो शेअर करत म्हणाली, ‘अशक्य ही शक्य..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वत्र आनंदी, उत्साही आणि भक्तिपूर्वक वातावरण तयार झाले आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सगळेच आनंदी झाले आहेत. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुल पै यांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत.

अभिज्ञाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर घरगुती बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. अभिज्ञाच्या घरगुती बाप्पासाठी साकारलेल्या आकर्षक देखाव्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिज्ञाच्या घरी यंदा अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर देखाव्याच्या स्वरूपात साकारण्यात आले आहे. अभिज्ञाने पती मेहुलसोबत लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वामीरुपी मूर्तीची पूजा केली. कुटुंबासोबत बाप्पाचे कोडकौतुक केले.

अभिज्ञाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘श्री स्वामी समर्थ!! गणपती बाप्पा मोरया…अशक्य ही शक्य करतील स्वामी.. खरा होई जागा श्रद्धेसहीत, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हाथ, अशक्य हि शक्य करतील स्वामी’.

घरगुती गणपती बाप्पासाठी अभिज्ञा आणि मेहुल पै यांनी साकारलेल्या सुंदर देखाव्याविषयी बोलताना ते म्हणाले कि, ‘मंदिराचा हा भव्य देखावा साकारला कारण, बाप्पाला आणि आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटलं पाहिजे हा आमचा एकमेव उद्देश होता’. अभिज्ञाचा घरगुती बाप्पा आणि देखाव्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले आहेत.