हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. कायम विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मालिका तसेच चित्रपटांमधून वेगवेगळ्या ढंगाच्या आशयाच्या भूमिका साकारून कायम त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. असा अभिजित समाजातील दुर्लक्षित तसेच गंभीर विषयांवरदेखील अगदी परखडपणे बोलताना दिसतो. दरम्यान नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो आपल्या मुलाला चपाती बनवायला शिकवतोय. याच कारण देताना त्याने लिहिलेलं कॅप्शन अत्यंत चर्चेत आहे.
अभिनेता अभिजित केळकरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा लहान मुलगा मल्हार चपाती लाटण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अभिजित आपल्या मुलाला स्वयंपाक करायला शिकवतोय हे पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अभिजीतचा मुलगा मल्हार या व्हिडिओमध्ये चपाती लाटण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. गोल होत नसली तरीही छोटा मल्हार करत असलेला प्रयत्न पाहून त्याचे करावे तितके कौतुक कमीच वाटते.
या व्हिडिओसोबत अभिजीतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि. ‘खरे संस्कार मुलांवर (पुरुषांवर) करण्याची गरज आहे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनचं व्हायला हवी’. या कॅप्शनसोबत अभिजीतने चाहत्यांना जो संदेश दिला आहे तो खरोखर महत्वाचा आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत अभिजीतचे समर्थन केले आहे. शिवाय छोट्या मल्हारचे कौतुकदेखील केले आहे. एकाने लिहिलंय, ‘अगदी बरोबर….मुलांना आणि मुलींना…निदान आपली कामे तरी करता आली पाहिजेत…जेणे करून त्यांचं काही अडणार नाही….!!’