‘त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी गुदमरलो आणि..’; शूटिंगदरम्यान अभिनेत्याने अनुभवला भयानक थरार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट, नाटक, मालिका यांशिवाय वेब सिरीजदेखील मनोरंजनाचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेब सिरीजकडे आहे. अलीकडेच २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘दुरंगा’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हि सिरीज झी 5’वरील कोरियन ड्रामा ‘फ्लॉवर ऑफ एव्हिल’वरून प्रेरित आहे. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्याही सिजनमध्ये गुलशन देविया, दृष्टी धामी, अमित साध आणि अभिजीत खांडकेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान अभिजीतने शूटिंगवेळचा एक किस्सा सांगितला आहे.

या वेब सिरीजमध्ये मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर हा विकास सरोदे ही भूमिका साकारतो आहे. जो एक पत्रकार आहे. अलीकडेच एका नामवंत वृत्त वाहिनीला मुलाखत देताना अभिजीतने सीरिजमधील सर्वात कठीण सीनबद्दलचा अनुभव सांगितला आहे. या मुलाखतीत अभिजितने सांगितले कि, ‘पहिल्या सीझनमध्ये एक सीन आहे जिथून सर्वकाही सुरू होतं. मी अभिषेकच्या (गुलशन देविया) वर्कशॉपमध्ये त्याला भेटण्यासाठी जातो आणि अभिषेक मला पकडतो आणि माझे अपहरण करतो. पण या सीनचे आम्ही तसे रिहर्सल केले नाही.’

पुढे म्हणाला, ‘अभिषेकने मला मागून पकडले आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोन- तीन रिहर्सल केल्यावर, गुलशन आणि मी दोघेही सीनबद्दल खूप गंभीर आणि सावध होतो. पण तरीही मी थोडा गुदमरलो होतो. यात कोणाचाही दोष नव्हता, पण त्या क्षणी आम्ही दोघेही इतके भूमिकेत शिरलो होतो की मी बेशुद्ध पडेन असं वाटलं होतं’. ‘दुरंगा २’ या वेब सिरीजचे एकूण ८ एपिसोड आहेत आणि पहिल्या पर्वाप्रमाणेच यातही थरार आणि रहस्य राखण्यात आले आहे. या सिरीजमधील भूमिकेसाठी अभिजीतचे कौतुक केले जात आहे.