‘मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी…’; ‘झिम्मा 2’बाबत मराठी अभिनेत्याने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा’च्या अभूतपूर्व यशानंतर आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा सिक्वल धुमाकूळ घालतो आहे. शुक्रवारी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. केवळ प्रेक्षक नव्हे तर समीक्षक देखील या चित्रपटाची वाहवाह करत आहेत. अशातच मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकरकडे हा चित्रपट पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया फारच चर्चेत आली आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चित्रपट कसा वाटला याबद्दल लिहिले आहे.

अभिजित खांडकेकरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘झिम्माच्या पहिल्या भागाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर दुसऱ्या भागात काय असेल ह्याची खूप उत्सुकता होती …. आणि हेमंत did not disappoint me at all. चार पाच वेगवेगळ्या बायका, त्यांना ट्रीप वर घेऊन जाणारा एक तरूण, प्रत्येकाची आपापली बॅगेजेस आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्याने कळणार्या कितीतरी गोष्टी… साधी सोपी अजिबात फॅन्सी नसलेली कन्सेप्ट… पण त्यात जे काही रंग भरले आहेत…. त्याला तोड नाही. मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं ह्या सगळ्याच्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर अशी. इरावतीचं लिखाण कधी स्क्रिप्ट वाटतच नाही. प्रत्येक बाई वेगळी, तीचा स्वभाव, पार्श्वभूमी, इश्यू वेगळे, पण त्यांचं एकत्र येणं तुम्हाला हसवतं, रडवतं, अंतर्मुख व्हायला भाग पाडतं’.

‘झिम्मा २ मध्ये तर कितीतरी विषयांना हाताळून, अल्लाद कथेत गुंफवत, निर्मिती ताई, सुहास ताई, क्षिती, सुचित्रा ताई अश्या बाप अभिनेत्रींना मुक्त सोडत, सिद्धार्थ, सायली, शिवानी, रिंकू अश्या मल्टी टॅलेंटेड कलाकारांकडून खुबीने त्यांची पात्र साकारून घेत आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बडेजावा शिवाय हेमंतने कमालीनं हा ‘महा झिम्मा’ सहजतेनं घातलाय. वेगवेगळे पदर गुंता होऊ न देता अलगद उलगडून दाखवावेत तर असे.. सुहास ताईच्या सहजतेचं काय करावं, सुचित्रा ताईसारखी आत्या तर प्रत्येक कुटुंबात असतेच, निर्मिती ताई नुसती पडद्यावर दिसली तरी हास्याचे स्फोट होतात ही तीची ताकद, क्षितीच्या सीनची तर वाट बघावी आणि तीने सिक्सरच मारावा, सायली जशी दिसते आहे त्या उलट कॅरेक्टर सुरेख साकारलय. एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळणारा कबीर सिद्धूने तोडलाय, विशेष कौतुक शिवानी आणि रिंकूचं – गॅंगमध्ये नविन असुनही inseparable. सुंदर कामं केलीयेत’.

‘क्षितिजच्या गाण्यांमधुन अख्खा सिनेमा कळावा इतकी अर्थपूर्ण. अमितराजचं संगीत हे एक ह्या सगळ्यांबरोबर असणारं कॅरेक्टरच, सचिन गुरवचं पोस्टर तितकंच बोलकं, इरावती, हेमंत थॅंक यू ह्या कमाल अनुभवासाठी, आनंद एल राय आणि जिओ मुळे यंदा टीम अजुनच भक्कम झालीये त्यामुळे यंदा झिम्मा २ अजुनच गाजवणार यात शंका नाही…. हा रिव्ह्यू किंवा परिक्षण नाही. मी लेखक नसल्याने हे लिहिलेलं माझ्या विचारांइतकच विस्कळीत आहे पण मुद्दा हाच की चित्रपट आजपासुन प्रदर्शित होतोय, तो नवनवीन विक्रम करेलच, तुम्ही लवकरात लवकर पहा’. दरम्यान ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका असून एक हलकी फुलकी पण मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट या चित्रपटात बांधली आहे.