‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत वैदेहीसारखी हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही असल्याचे मोनिकाला वाटत होते. पण आता ती वैदेही नसून मंजुळाचं असल्याचे सत्य समोर आले असून मोनिका रागाच्या भरात टोकाची भूमिका घेऊ नये म्हणून मल्हार तिची समजूत घालत आहे. मंजुळा, मोनिका आणि मल्हार यांच्या नात्यातील गुंतागुंत वाढत असताना मालिकेत साहेबराव या नव्या पात्राने एंट्री घेतली आहे आणि हि भूमिका अभिनेता अभिजित केळकर साकारतो आहे.

मालिकेत नव्याने एंट्री घेतलेल्या साहेबरावला मंजुळासोबत लग्न करायचं आहे. पण मंजुळाला साहेबरावसोबत लग्न करायचं नाही. पण त्याने जबरदस्तीने मंजुळासोबत साखरपुडा केला आणि म्हणून ती गावातून पळून थेट मुंबईत गेली. यानंतर स्वराच्या भेटीमुळे योगायोगाने मंजुळा कामतांच्या घरी पोहोचली. मंजुळा आणि स्वराचं नातं घट्ट झालं असताना आता साहेबरावाला मंजुळा कामतांच्या घरी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तिला मिळवण्यासाठीतो काही ना काही कट करताना दिसणार. दरम्यान मंजुळाला मिळवण्यासाठी तो स्वराचा वापर करेल किंवा तीचं आयुष्य पणाला लावेल यात काही शंका नाही.

‘साहेबराव’ हे निगेटिव्ह पात्र बिग बॉस मराठी फेम आणि मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिजीत केळकर साकारतो आहे. या पात्राच्या नावाप्रमाणे त्याचा लुकदेखील रांगडा आहे. या मालिकेमुळे अभिजित बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अभिजीतने याआधीसुद्धा स्टार प्रवाहसोबत काम केलं आहे. ‘पुढचं पाऊल’ आणि ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर आता तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत झळकणार आहे.