आधारवड हरपला!! वडिलांनंतर अभिनय बेर्डेने गमावले रवींद्र काका; ‘तो’ फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज निधन झाल्याचे वृत्त सकाळी आले आणि संपुन सिनेसृष्टी हादरली. वयाच्या ७८ व्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाला निरोप दिला. रवींद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. कॅन्सरसारख्या आजराशी दोन हात करताना रविंद्र बेर्डे यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकाला काका रविंद्र यांचा आधार होता आणि आता अभिनयचा आधारवडचं हरपला आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांना म्हणजेच अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांना काका म्हणून रवींद्र बेर्डे यांचा आधार मिळाला. पण आता काकांच्या निधनानंतर पुतण्या अभिनय आणखीच कोलमडून गेला आहे. अभिनयने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना काका रविंद्र यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रविंद्र बेर्डेंसोबत अभिनय आणि स्वानंदी दिसत आहेत. दोघांनी काकांच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि रविंद्र यांनीसुद्धा छान स्माईल दिली आहे. हा फोटो शेअर करुन अभिनयने काकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या फोटोत रवींद्र बेर्डे आजारपणाशी झुंज देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. माहितीनुसार, अनेक दिवस त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना घरी आणल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. १९६५ साली वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. पुढे सिनेसृष्टीत ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. अशोक सराफ, महेश कोठारे, विजय चव्हाण, विजू खोटे आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांनी स्क्रीन शेअर केली आहे. अगदी सख्खा भाऊ लक्ष्यासोबत देखील त्यांची जोडी हिट ठरली.