अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर ‘विठू माऊली’च्या भूमिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. ‘विठू माउली’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘इंद्रा’ ही भूमिका साकारताना दिसला. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजिंक्यने केवळ मालिकाच नव्हे तर काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘टकाटक २’ आणि ‘सरी’सारखे दर्जेदार चित्रपट दिल्यानंतर तो आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. नुकताच त्याच्या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

अजिंक्य राऊतचं फॅन फॉलोइंग मोठं आहे. त्याचा लुक आणि अभिनय प्रेक्षकांवर भुरळ घालतं. त्यामुळे अजिंक्यने मालिका विश्वात पुन्हा एकदा यावे अशी प्रेक्षकांची मनापासून इच्छा होती आणि हि इच्छा आता पूर्ण झाली आहे. अजिंक्य राऊतने मालिका विश्वात कमबॅक केलं आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मालिकेत अजिंक्यसोबत अभिनेत्री जान्हवी तांबट विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही लपूनछापून फुलणारी लव्हस्टोरी आहे. या प्रोमोमध्ये नायिका वेष बदलते आणि मुलासारखी नायकासोबत वावरताना दिसतेय. मुख्य म्हणजे तिचे त्याच्यावर आणि त्याचे तिच्यावर प्रेम आहे. पण दोघेही एकमेकांना बोललेले नाहीत. नायिका नायकाची बॉडीगार्ड बनून फिरतेय. नायकाला माहितचं नाही. हा मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवड्ताना दिसतोय. कारण बॉडीगार्ड बनलेली नायिका कथानकाला आकर्षक बनवते आहे. आता हा बॉडीगार्ड सगळ्यांसमोर खऱ्या रूपात कसा येईल..? नायक आणि नायिकेची प्रीती कशी फुलेल? पाहण्यासाठी मालिका पाहावी लागेल. ही मालिका येत्या १७ जुलै २०२३ पासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.