‘डॉक्टरांकडून पहिली ट्रीटमेंटच चुकली अन…’; अभिनेते अतुल परचुरेंची कॅन्सरशी झुंज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनवार्तेने मराठी सिनेसृष्टी शोकाकुल झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कला विश्वातील दिग्गज मंडळी चटका लावून एक्झिट घेत आहेत. काही दिवसांपुर्वी सुलोचना दीदींचे निधन झाले आणि आज रविंद्र महाजनी कालवश झाले. अशातच आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

अतुल परचुरे यांनी युट्यूबवरील ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटेने घेतलेल्या मुलाखतीत खुलासा करताना सांगितले कि, ते पत्नी सोनियासोबत लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूझीलँडला गेले असताना त्यांची खाण्यावरून वासना उडाली. काही दिवसांनी त्यांना कावीळ झाल्याने डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी सोनोग्राफी केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी सिटी स्कॅन केला. ‘उद्या आपण MRCP करु. त्यानंतर काही टेस्ट’ असे डॉक्टरांनी सांगितले. या टेस्टनंतर डॉक्टर म्हणाले, ‘लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्युमर दिसतोय. हा साधारण पाच सेमीचा आहे. काळजी घ्या आणि कॅन्सर स्पेशलिस्टला भेटा’. अतुल यांना ट्युमर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांनी घरी येऊन सर्वात आधी हि गोष्ट आईला सांगितली. अतुल आईला म्हणाले, ‘डॉक्टर म्हणत आहेत की २- ३ प्रोसिजर्स आहेत ते झालं की तुमच्या लिव्हरची साईझ वाढेल मग आपण ते काढून टाकू’. यावर आईने म्हटले, ‘काळजी करु नकोस. होईल ठीक’. यानंतर अतुल यांनी मोठ्या धीराने बायको सोनियाला सांगितले. तर तिनेही अतुल यांना धीर दिला.

या मुलाखतीत अतुल आवर्जून म्हणाले कि, ‘त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी. माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे’. पुढे त्यांनी सांगितले कि, ‘२९ डिसेंबर रोजी पहिली ट्रीटमेंट झाली. पण ही पहिली प्रोसिजरच चुकीची झाली. ट्युमर राहिला बाजूला मला पॅनक्रीटिटीस झाला. यामुळे पोट खूप सुजलं. खाल्लं की ढेकर यायचे. अडीच महिन्यानंतरही डॉक्टरांना योग्य उपचार सापडला नाही. यामुळे तब्येत खूप बिघडली. पायाला भयंकर सूज, अनिद्रा, बोलता बोलता जीभ सुकायची त्यामुळे नीट बोलताही येत नव्हतं. त्यानंतर सगळे मित्रमंडळी, नातेवाईक मदतीला धावून आले आणि योग्य उपचारानंतर मी या संकटातून सुखरूप बाहेर पडलो’. अतुल यांच्यावर योग्य उपचारांनंतर आता ट्युमर हळूहळू कमी झालाय. येत्या महिन्यात पुन्हा त्यांची तपासणी होईल आणि मग आजाराचा धोका टळला आहे का नाही हे समजेल.