हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात गेली अनेक वर्ष कलेच्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकिर्दीला लक्षात घेऊन त्यांना मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ३४’वा ‘पुण्यभुषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
‘पुण्यभूषण’ हा पुरस्कार मोहन आगाशे यांच्यासाठी खूपच खास ठरला. कारण त्यांना हा पुरस्कार त्यांच्या वाढदिवशीच प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ‘पुण्यभूषण’च्या मंचावर मोहन आगाशे यांना सर्वानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आगाशे यांना प्रदान केलेल्या पुण्यभुषण पुरस्काराचे स्वरूप ‘सन्मानाचे स्मृतिचिन्ह’ आणि ‘रूपये एक लाख रोख’ असे आहे. या पुरस्काराचे स्मृतीचिन्ह अत्यंत लक्षवेधी आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असणारे हे स्मृतिचिन्ह या पुरस्काराचे वैशिष्ट्य मानले जाते. त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी मंचाचे आभार मानले. यासमयी कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचादेखील मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात मृदुल घोष, सुदाम दिशोई, उमेंद्रा एम, निर्मलकुमार क्षेत्री या जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी मानकरी प्रतापराव पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.