रितेशने पुरवला लाडक्या लेकाचा हट्ट; स्वतःच्या हाताने केस कापून दिला नवा हेअर कट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने विशेष छाप सोडणार अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हे पावर कपल कायम चर्चेत असतं. या जोडीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. महाराष्ट्राचे लाडके दादा- वहिनी अशी त्यांची खास ओळख आहे. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले. ११ वर्षाच्या संसारात या जोडप्याने दोन मुलांना जन्म दिला. जी सोशल मीडियावर स्टारकिड्स मजहणून नव्हे तर त्यांच्या संस्कारांमुळे चर्चेत असतात. नुकताच जिनिलीयाने बाप- लेकाच्या घट्ट नात्याचे दर्शन घडवणारा एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे.

जिनिलीयाने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश त्याच्या लाडक्या लेकाचे केस कापताना दिसतोय. अभिनय विश्वात कार्यरत असल्यामुळे अनेकदा रितेश आणि जिनिलीया दोघांनाही शूटिंगसाठी बाहेरगावी जावे लागते. पण जेव्हा केव्हा शूटिंगमधून ब्रेक मिळतो दोघेही आपल्या मुलांना वेळ देण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे अनेकदा हे चौकोनी कुटुंब सोशल मीडियावर चर्चेत येत असत. आताही जिनिलियाने रितेशचा आणि लेकाचा शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

जिनिलीयाने हा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यासोबत तिने लिहिलेले कि, ‘जेव्हा मुलगा आपल्या बाबांकडे माझे केस कापून द्या असा हट्ट धरतो… माझ्यामते प्रत्येक मुलाला महागड्या गिफ्ट्सपेक्षा आपल्या आई- वडिलांच्या अशा प्रेमाची खूप जास्त गरज असते’. या व्हिडिओमध्ये रितेश घरातल्या घरातच आपल्या मुलाचे केस कापून त्याला नवा हेअर कट देताना दिसतोय. अशाप्रकारे रितेश व्यस्त शेडयूमधूनसुद्धा आवर्जून आपल्या मुलांना वेळ देताना दिसतो.