‘मला मोह झाला आणि…’; मराठमोळ्या अभिनेत्याने चक्क रस्त्यावर तळली गरमा गरम भजी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेविश्वातील कलाकार मंडळी सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कायम काही ना काही करताना दिसतात. कधी अतरंगी चाळे तर कधी स्टंट करणारे हे सेलिब्रिटी अनेकदा वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत येतात. तर काही कलाकार मंडळी मात्र त्यांच्या साधी राहणी आणि माणुसकी, समाजसेवा अशा विशेष गुणांमुळे चर्चेत येतात. असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अभिनेता संदीप पाठक हा ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकामुळे घराघरांत लोकप्रिय ठरला. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर कायम छाप सोडली आहे. मुख्य म्हणजे या नाटकाच्या प्रयोगांमुळे तो कायम ठिकठिकाणी दौरे करताना दिसतो. अशाच नाटकाच्या दौऱ्यानिमित्त प्रवास करत असतानाचा अभिनेत्याचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवासादरम्यान संदीपने चक्क गाडी थांबवून दुकानदाराची विचारपूस करत भर रस्त्यात स्वत:च्या हाताने गरमागरम भजी तळली. भजी खाण्याच्या मोहाविषयी आपण ऐकले असेल पण भजी तळण्याचा मोह संदीपच्या कृतीतून दिसून आला.

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ संदीप पथकाने स्वतः शेअर केला आहे. ‘प्रवासात मला प्रत्येक ठिकाणी थांबून वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. सुरडी फाटी (कळंब) जवळ आकाश नावाचा मुलगा गरम गरम भजी तळत होता, मला मोह झाला भजी तळण्याचा आणि खाण्याचा. Thank you आकाश’, असे कॅप्शन लिहीत अभिनेता संदीप पाठकने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. संदीपच्या साध्या स्वभावाने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.