‘मला माझ्या मुलासाठी…’; अभिनेता शशांक केतकरचं गणपती बाप्पाकडे भावनिक मागणं


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत श्री ही भूमिका साकारत प्रकाशझोतात आलेला शशांक सध्या ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान गणेशोत्सवानिमित्त शशांकच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे. मनोभावे सेवा करताना शशांकने बाप्पाकडे आवर्जून एक मागणे केले आहे. ते काय आहे..? याविषयी जाणून घेऊया.

शशांक केतकर हा मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. आपल्या उत्तम अभिनयासाठी शशांक केतकर ओळखला जातो. त्याच्या अभिनय शैलीतून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आता शशांक केतकरचे नाव घेतले जाते. इतकच काय तर आता मराठीबरोबर तो हिंदीतही आपली छाप उमटवत आहे. अलीकडेच शशांक हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. शिवाय लवकरच तो आणखी एका बिग बजेट वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या शशांकचं शेड्युल फार व्यस्त आहे. परिणामी तो त्याच्या कुटुंबाला हवा तसा वेळ देऊ शकत नाहीये.

दरम्यान एका एंटरटेन्मेंट माध्यमाशी संवाद साधताना शशांकने लाडक्या बाप्पाकडे एक मागणी केली आहे. यावेळी शशांकने म्हटलं कि, ‘मी गणरायाकडे वेळ मागेन. कारण मला आता ऋग्वेदला वेळ देता येत नाहीये. मला यामुळे कसंतरी होतं असतं. जेव्हा सकाळी निघतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा घरी परतो तेव्हा देखील तो झोपलेला असतो. जे आपण अनेक गोष्टी आणि गाण्यांमध्ये ऐकतो, तसं माझ्याबरोबर होतंय. त्यामुळे मी बाप्पाकडे वेळ मागेन जो मला माझ्या मुलासाठी द्यायचा आहे. तसेच सगळ्यांसाठी स्वास्थ, सगळीकडे स्वच्छता, शांतता नांदू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना करेन’.