असाच प्रेम पाठीशी रवांदेत!! ‘कोकण रत्न’ पुरस्काराने कोकण कन्येचा सन्मान; अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री दीपा परब ही मराठी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी असली तरीही तिची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. दीपा परब- चौधरी हि मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. या वर्षात दीपाचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजला. शिवाय झी मराठीवरील तिची ‘तू चाल पुढं’ हि मालिकादेखील कमालीची लोकप्रिय ठरली आहे. अशातच दीपाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. नुकताच तिचा ‘कोकणरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

अभिनेत्री दीपा परब- चौधरीही मूळची कोकणी. त्यामुळे या कोकण कन्येचे तिच्या कामगिरीसाठी कौतुक करताना तिला ‘कोकणरत्न’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लग्नानंतर संसारात रमलेली दीपा मध्यंतरी संसार आणि मुलाचे संगोपन यामुळे सिनेविश्वापासून दुरावली. पण आता तिने पुन्हा एकदा कमबॅक करत संधीचे सोने केल्याचे आपण पहिले. ‘बाईपण भारी देवा’ मधील तिची भूमिका आणि ‘तू चाल पुढं’मधील अश्विनीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि या विशेष सत्कारासाठी दीपाने सर्वांचे आभार मानताना एक पोस्ट शेअर केली आहे.

दीपा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या अनेक पोस्टमधून ती कोकणावरील प्रेम व्यक्त करताना दिसते. अशातच कोकणवासियांनी दीपाच्या कामाची दखल घेऊन तिचे कौतुक केल्याने अभिनेत्री भारावून गेली आहे. दीपाने सोशल मीडियावर पुरस्कार स्विकारताने काही फोटो शेअर करत लिहिलंय, ‘मी आज खूप खूश आसय कारण माझ्या माहेरसून (कोकणातून) ह्यो ”कोकण रत्न” पुरस्कार माका मिळालो हा. तुमच्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचा असाच प्रेम कायम माझ्या पाठीशी रवांदेत ह्याच देवाकडे मागणा आसा’. दीपाच्या या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर मालवणी भाषेत अभिनेत्रींचे कौतुक करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.