अभिनेत्री क्षिती जोगचं Facebook हॅक; पेजवरून शेअर होतायत अश्लील व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्षिती जोग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेसृष्टीला तिने आपल्या अभिनयाने भारावून टाकले आहे. अलीकडेच ती करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी कि प्रेमकहानी’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिचे मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातून कौतुक केले गेले. ज्यामुळे सोशल मीडियावर क्षितीची भारी हवा आहे. असे असताना क्षिती जोगचे फेसबुक हॅण्डल हॅक झाल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री क्षिती जोग सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. या माध्यामातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. दरम्यान क्षितीचे अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुक हॅक झाल्याचे समोर आले. तिच्या फेसबुकवरून काही अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. याबाबत क्षितीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. आतापर्यंत हॅकरने क्षितीच्या फेसबुकवरून ५ अश्लील कंटेंट असणारे व्हिडीओ शेअर केले आहेत.

याबाबत माहिती देताना क्षितीने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये क्षितीच्या फोटोसोबत लिहिलंय कि, ‘चलचित्र मंडळीच्या निर्माती, अभिनेत्री क्षिती जोग यांचं फेसबुक पेज हॅक करण्यात आलं आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे आपण दुर्लक्ष करावं. आम्ही पेज पुन्हा सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा, हीच विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर चलचित्र मंडळी’.