स्वप्नपूर्ती!! माधुरी पवारने साताऱ्यात खरेदी केलं आलिशान घर; गृहप्रवेशाचा व्हिडीओ झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनीं सौंदर्य, अदाकारी आणि नृत्य शैलीच्या आधारावर अनेकांचे मन जिंकले आहे. यांमध्ये एक म्हणजे ‘अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री माधुरी पवार. या कार्यक्रमाने माधुरी पवारला प्रकाशझोतात आणली. पुढे माधुरीने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली. त्यानंतर ‘देवमाणूस’ मालिकेतदेखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री माधुरी पवार हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे कामाबाबत अपडेट देताना ती अनेकदा वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करताना दिसते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट शेअर केली आहे. माधुरीने नव्या वर्षाची सुरुवात करताना तिच्या नव्या आलिशान घरात गृहप्रवेश केल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या नव्या घाला एक व्हिडीओ शेअर करत झलक दाखवली आहे.

अभिनेत्री माधुरी पवारच्या या आलिशान घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो | मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा |’ माधुरीने पारंपरिक पद्धतीने पूजा करून तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे आणि यावेळी तिचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. कॅप्शनमध्ये तिने स्वप्नपूर्ती असा हॅशटॅग दिला आहे. माधुरीच्या घराच्या नेमप्लेटवर ‘पवार फॅमिली’ असे लिहिले आहे. माधुरीच्या या व्हिडिओवर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या कमेंट केल्या आहेत.