हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मनवा नाईक ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मनवा अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे भाष्य करताना दिसते. सोशल मीडिया अत्यंत प्रभावी साधन असल्यामुळे आपले विचार, आपली मत मांडण्यासाठी हे फायदेशीर माध्यम बनले आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी या माध्यमातून व्यक्त होतात. नुकतीच अभिनेत्री मनवा नाईकने एक पोस्ट शेअर केली आहे. जिच्या माध्यमातून तिने मुंबईच्या होणाऱ्या ऱ्हासावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
सध्या मुंबईमध्ये सर्वत्र खोदकाम, बांधकामे सुरु असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे हवा प्रदुषण आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. यावर मनवाने संताप व्यक्त करत म्हटले आहे कि, ‘हे पूर्णपणे निराशाजनक आहे. वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम, रहदारी आणि सौंदर्य शास्त्राच्या दृष्टीने मुंबई आता सर्वात वाईट शहर आहे. धुळीने माखलेल्या इमारतींचे कुरूप ब्लॉक्स वाढतच जात आहेत. नवीन पायाभूत सुविधांच्या सबबीखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जाते. बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखी राहिली नाहीत. यानंतर आता रेस कोर्सचाही नंबर आहे. त्यामुळे हे सगळं पाहून मन दुखावलं गेलं आहे’.
मनवा नाईकने हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. हि पोस्ट तिने शेअर केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत मनवाच्या मताचे समर्थन केल्याचे दिसत आहे. मुंबईची अवस्था दयनीय आहे आणि येत्या काळात आणखीच वाईट होऊ शकते.. या मतावर अनेक नेटकऱ्यांनी शिक्कामोर्तब केला आहे.